विषमतावादी शक्तिंविरोधात लढण्याचे एकमेव साधन ‘संविधान! ‘ – लक्ष्मीकांत देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | “आज आपल्या देशात विषमतावादी शक्ती प्रबळ झाल्या आहेत, त्यांच्या विरोधात लढण्याचे एकमेव साधन संविधान आहे”, असे वक्तव्य  अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ते लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण शिबिरातील मुलाखतीत बोलत होते. त्यांनी विद्यार्थी दशेतील युक्रांदमधील दिवस, सनदी अधिकारी, साहित्यिक म्हणून आलेले अनुभव संवादकांसमोर मांडले. ते म्हणाले, ” मी अधिकारी असताना घेत असलेले निर्णय संविधानाच्या कसोटीवर उतरत आहेत का याचा विचार करुनच निर्णय घेतले. त्यामुळे माझ्या अनेकदा बदल्या झाल्या. पण त्यामुळेच मला सबंध महाराष्ट्रात काम करण्याचा अनुभव घेता आला.”

पुणे येथील एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र व एस. एम. जोशी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संविधान संवादकांचे हे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरास महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. शिबिरात राजवैभव शोभा रामचंद्र, सुनील स्वामी, सुभाष वारे यांनी प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेतले तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
एस. एम. जोशी फाऊंडेशनचे सचिव सुभाष लोमटे हे उद्घाटन सत्राचे अध्यक्ष होते. संविधानाने कष्टकरी जनतेला आधार देण्याचं उद्दिष्ट बाळगले. हे लक्षात घेऊन कष्टकरी जनतेच्या प्रश्नासाठी काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शितल यशोधरा हिच्या संकल्पना आणि लेखनातून महाराष्ट्रभरातील संविधान संवादकांचे स्वागत करण्यासाठी थेट ‘ साऊ-जोती’ हे नाट्य उभे केले होते. अस्मिता जावळे आणि मिलिंद जावळे या दोघांनीही चांगला अभिनय करत साऊ जोती साकारले. प्रशिक्षण हॉलला समताभूमी असे नाव देण्यात आले होते. शर्मिला जोशी हिने बनवलेले ‘आम्ही भारताचे लोक’ हे टॅग सर्व संवादकांच्या हाती दिले होते.हे टॅग हातात उंचावून सर्वांनी साऊ जोतींना अभिवादन केलं.


शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना संवाद केंद्राचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारेंनी “संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही आणि समजा संविधान वाईट असेल तरीही ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्या वर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही,” हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेतील इशारा उद्धृत केला.पुढे ते म्हणाले,” बाबासाहेबांनी काढलेले हे उद्गार आजही प्रस्तुत आहेत किंबहुना आज ते प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजेत म्हणजे आजच्या सर्व गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधणे सोपे होईल.”

‘मुस्लिम समाजाचे प्रश्न आणि ते सोडवण्याचा संविधानिक मार्ग’ या विषयावर बोलताना मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी म्हणाले, ” समान नागरी कायद्याला गोळवलकर गुरूजींनी विरोध केला होता आणि आज मात्र अल्पसंख्यांकांना लक्ष करत धार्मिक उन्माद वाढवण्याच्या हेतूने हिंदूत्ववादी समान नागरी कायदा आणण्याचे प्रयत्न करत आहेत. घटनाकारांनी राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वात समान नागरी कायदा घेतला आहे. आजचे केंद्रातील सरकार घटनाकरांना अभिप्रेत असलेला समान नागरी कायदा आणत आहे की, हिंदुत्ववाद्यांना अपेक्षित असलेला कायदा आणत आहे हे पाहणे अधिक गरजेचे आहे.”  प्रा. तांबोळींनी देशातील अल्पसंख्याक विरोधी वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली.

श्यामसुंदर सोन्नर महाराजांनी संत साहित्य व संविधान एकमेकांशी किती सुसंगत आहे हे किर्तनातून संतांच्या अभंगाचे दाखले देत सांगितले. “जो समता, बंधुत्व, स्वातंत्र्य, सामाजिक न्यायाचा विचार संविधानात मांडला आहे, तोच विचार सातशे वर्षापूर्वी संतांनी मांडला होता. त्याचा जागर केला होता. संविधानाच्या अनुच्छेद 51 अ मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, सुधारणावादी विचार करणे, अंधश्रद्ध निर्मूलन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे असं सांगितले आहे. आपल्या संतांनी देखील सुधारणावादी, अंधश्रद्धा विरोधी विचारांचा जागर केलेला होता” असे महाराज किर्तनात म्हणाले.

शिबिराचा समारोप करताना अॅड. असीम सरोदे म्हणाले, “आज देशात चर्चेवीना कायदे पास केले जात आहेत. ही पद्धत संविधानिक नैतिकतेत अजिबात बसत नाही. घटनाकारांना ही पद्धत अजिबात अभिप्रेत नव्हती.” शिबिरार्थींना जबाबदारीची जाणीव करून देताना अॅड. सरोदे म्हणाले, “आता कोणत्याही घटनेवर व्यक्त होताना, उथळपणे व्यक्त न होता संविधानिक दृष्टिकोनातून व्यक्त होण्याची तुमच्यावर जबाबदारी असणार आहे. तुम्ही संविधान जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहात हे आश्वासक चित्र आहे.”

तळागाळातील लोकांपर्यंत संविधानिक विचार पोहोचविणे, जनजागृती करणे व संविधान विरोधी शक्तींचा मुकाबला करणे या दोन आव्हानांवर काम करण्याचा दृढनिश्चय करून तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली.

शिबिराला मिळून सार्याजणीच्या गिताली वि.म. तसेच फाऊंडेशनचे उपसचिव उपेंद्र टन्नू यांनी सदिच्छा भेट दिली.

लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रची एक खासियत अशी कि संविधान तुमच्या बोली भाषेत सोप्प करून सांगायचं. तेच तंत्र तीन दिवसीय शिबिरात शिबिरार्थी गाणी, अभंग, भारूड ,शॉर्ट फिल्म,स्किट्स, अंधा दौरा. मान्यवरांच्या मुलाखती अश्या अनेक माध्यमातून शिकले.

केंद्राचे कार्याध्यक्ष सुनील स्वामी, सचिव राजवैभव शोभा रामचंद्र, सदस्य कृष्णात स्वाती,संजय रेंदाळकर, हर्षल जाधव, रेश्मा खाडे, तसेच सुधीर कांबळे तसेच संघसेन जगतकर यांच्या मार्गदर्शनाने शिबीर यशस्वीरित्या पार पडले. सर्व संयोजनाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पडणाऱ्या संवादकांच्या पुणे टीमचे खूप कौतुक करण्यात आले.