व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आठवडी बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, पोलीस ठाण्यासमोरच करण्यात आली नियमांची पायमल्ली

सांगली । प्रथमेश गोंधळे ।

सांगलीसह जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होतानाचे चित्र आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. मात्र हे आदेश कागदावरच असल्याचं चित्र शनिवारी पाहायला मिळालं. सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच भरलेल्या शनिवार आठवडी बाजारात अक्षरशः ग्राहक आणि खरेदीदारांच्या गर्दीचा महापूर उठला होता. यावेळी विक्री करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्यांच्या तोंडावर मास्क लावलेला नव्हता.

खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने दुपारी मोठी वाहतूक कोंडी याठिकाणी झाली होती. ऐनवेळी नाकाबंदी करून दंड करणारे पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी मात्र यावेळी गायब झाल्याचे चित्र होते. आठवडी बाजारातील गर्दी लक्षात घेता पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतेय कि काय अशीच परिस्थिती होती. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

सांगली जिल्ह्यातही रुग्णसंख्येत वाढ होत असून तिसर्‍या लाटेकडे वाटचाल सुरु झाले आहे. दररोज ५० च्या घरात जिल्ह्यामध्ये रुग्ण आढळत आहेत. सांगली शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. अशातच आठवडी बाजारांमध्ये अशी गर्दी उसळली तर कोरोनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.