नागपुरातील खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पात हात तुटल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपुरातील खापरखेडा 500 मेगावॅट औष्णिक वीज केंद्रात एक धक्कादायक घडली आहे. यामध्ये टीपी 103 क्रशर हाऊस परिसरातील कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याने एका कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर कंत्राटी कामगारांनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. यानंतर या नुकसानभरपाईसंदर्भात वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत कंत्राटी कामगार व स्थानिक राजकीय नेत्यांची यशस्वी चर्चा झाली. या चर्चेनंतर मृतक कामगाराच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोल हेमराज जाने असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल हेमराज जाने हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मृत अमोल हा खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रात लोणारे ब्रदर्स या कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. सोमवारी रात्री हि दुर्दैवी घटना घडली आहे.

हात धडावेगळा झाला
अमोल टीपी 103 क्रशर हाऊस येथे काम करत होता. त्याला काही कळण्याच्या आत कोळसा वाहून नेणार्‍या कन्व्हेअर बेल्टमध्ये त्याचा हात अडकला आणि तो हात धडावेगळा झाला. अमोलच्या सहकारी कंत्राटी कामगारांना कळताच त्यांनी वीज केंद्रातील वरिष्ठ अधिकार्‍यांना या दुर्घटनेची माहिती दिली. यानंतर त्याला तातडीने नागपुरातील एलेकिसीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्रावामुळे अमोलचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्याचा अहवाल चार दिवसांत सादर करण्यात येणार आहे.

मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
घटनेच्या दुसऱ्या दिवशी वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर कंत्राटी कामगार एकत्र आले. त्यांनी मृतक अमोलच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. यानंतर झालेल्या बैठकीत कंत्राटदार लोणारे ब्रदर्स यांच्याकडून 2 लाख व महानिर्मितीच्या सीएसआर फंडातून 2 लाख असा एकूण 4 लाख रुपयांचा धनादेश मृतकाच्या कुटुंबाला देण्यात आला. तसेच महिनाभरात मृतक अमोलच्या पत्नीला वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून नोकरी देणार असल्याचे देखील सांगण्यात आले. क्रशर हाऊस परिसरात लिफ्ट असती तर अमोलचे प्राण वाचण्यास मदत झाली असती असे कामगारांचं म्हणणं आहे.

Leave a Comment