रिलायन्सला झटका : पुणे- बंगळूर महामार्गावरील दोन टोल नाक्यांवरील ठेका काढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेडशिवापूर आणि आनेवाडी या दोन टोल नाक्यांवरील वसुलीचा ठेका रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि कंपनीकडून अखेर काढून घेण्यात आला आहे. महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम पूर्ण न केल्याने केंद्र सरकारने रिलायन्सचा टोलवसुलीचा ठेका रद्द केला आहे. सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याठिकाणी टोल वसुली करत आहे. तसेच प्रत्येक महिन्याला जमा होणाऱ्या 25 कोटी टोल वसुलीतून महामार्गावर सहा पदरीकरण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

1 ऑक्टोबर 2010 रोजी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. हे काम 31 मार्च 2013 रोजी पूर्ण होणार होते, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. केंद्र सरकारच्या नियमानुसार सहापदरीकरणाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण झाले नाही तर मधल्या काळात टोल वसुली करता येत नाही. केंद्राने तशी नियमांत सुधारणा करुन सहा पदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुल करण्यावर बंदी घातली आहे.

तरी सुद्धा नियम, कायदे धाब्यावर बसवून पुणे -सातारा राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली करण्यात येत आहे. या महामार्गावर एका वर्षात अडीचशे कोटी रुपये टोल जमा होतो. ही अधिकृत आकडेवारी आहे. त्याचा विचार करता गेल्या आठ वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीने तब्बल दोन हजार कोटी रुपये टोल वसूल केला आहे. आणि हे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. प्रविण वाटेगावकर यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग 4 च्या टप्प्यात पुणे-सातारा विभागात हवेली येथील खेडशिवापूर आणि जावळी तालूक्यातील आणेवाडी या दोन ठिकाणी सन 2010 मध्ये टोल वसूल करण्याचे कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि कंपनीला 24 वर्षे करारावर देण्यात आले. त्यावेळी या टोलवसुलीतून चार पदरी रस्ता अडीच वर्षात सहा पदरी करण्याची अटही घालण्यात आली होती.