कोरोना विषाणू प्रसारावर नियंत्रण आणा : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना विषाणू प्रसारावर नियंत्रण, लसीकरणावर अधिक भर देण्याबाबत खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना देखील प्रशासकीय, वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या.

फुलंब्री तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी जास्तीत जास्त व्यापाऱ्यांच्या व संशयित रूग्णांच्या कोरोना चाचण्या कराव्यात. त्याचबरोबर जास्तीत जास्त कोरोनाचे लसीकरण करण्याबाबत जनजागृती करून लसीकरण वाढवावे, असे फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालय व कोवीड केअर सेंटर येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण पाहणी करताना बोलत होते. फुलंब्री येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधांची पाहणी केली.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खाटा आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी. त्याचबरोबर तालुक्यातील रुग्णांना तालुक्यातच उपचार मिळेल, यादृष्टीने प्रयत्न करावेत. फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयातील कोवीड केअर सेंटरच्या खाटांची, कोरोना लसीकरण केंद्रालाही भेट चव्हाण यांनी भेट दिली. जास्तीत जास्त लसीकरणासह मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्री बाबतही जनजागृती करण्यावर भर द्यावा. फुलंब्रीतील शासकीय विश्राम गृहामध्ये कोवीड केअर सेंटर सुरू करावे. फुलंब्री तालुक्यात १६ गावांमध्ये पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्याच्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर वाढवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी प्रशासनाला केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय येथील बाळंतपण कक्षाला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रास तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये स्थलांतरित करावे, अशा सूचनाही केल्या. डीसीएचसीसाठी प्रस्तावित असलेले सद्गुरू हॉस्पिटलची पहाणी करून तेथील सुविधांचा आढावा घेत हॉस्पिटल ऑक्सिजनने सज्ज असून १० पेक्षा जास्त व्हेंटिलेटरवर त्यांच्याकडे आहेत. सद्गुरू हॉस्पिटलला डीसीएचसीचा दर्जा देण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. तसेच सद्गुरू हॉस्पिटलमधील रुग्णांशी संवाद साधला.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पूजा पाटील, तहसीलदार डॉ. शीतल राजपूत, नगराध्यक्ष सुहास शिरसाट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश साबळे, नायब तहसीलदार प्रशांत काळे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, वाघमारे, शहराध्यक्ष योगेश मिसाळ, तलाठी अजित गावडे आदींची उपस्थिती होती.

बिल्ड्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये रुग्णांशी संवाद

फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील कोवीड केअर सेंटरमध्ये जाऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी रुग्णांशी संवाद साधला. कोविड केअर सेंटरमध्ये चांगल्या प्रकारची काळजी घेतली जात असल्याचे येथील रुग्णांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना सांगितले.

खुलताबाद तालुक्यातही भेट दिली

तालुक्यातील भद्रा मारोती मंदिर, खुलताबाद पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, ग्रामीण रूगणालय, भक्त निवास कोवीड केअर सेंटर येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन कोरोना परिस्थ‍िती जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या. यामध्ये तालुक्यातील गावांमध्ये पाच पेक्षा अधिक रूग्ण असलेल्या गावांमध्ये मायक्रो कंटेंटमेंट झोन तयार करावेत, असे निर्देश दिले. तसेच संशयित कोरोना रूग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या, व्यापाऱ्यांच्या चाचण्या यावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात लसीकरणाबाबत नगर परिषद पदाधिकाऱ्यांशीही चव्हाण यांनी चर्चा केली. खुलताबाद तालुका भेटी दरम्यान त्यांच्यासमवेत तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी सुरडकर, पोलिस निरीक्षक मेहेत्रे, संतोष आगळे. तालुका आरोग्य अधिकारी शिंदे आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

Leave a Comment