हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बकरी ईदसाठी सर्वत्र तयारी सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच सोशल मीडिया वर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती तो राहत असलेल्या सोसायटीच्या फ्लॅटमध्ये बकरी ईदला कुर्बानी साठी दोन बकरे घेऊन आला. त्यामुळे सोसायटी मधील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी जमा केली. आणि या घटनेला विरोध करत हनुमान चालीसा आणि जय श्रीरामचे नारे लगावले.
मुंबई येथील मीरा रोडवर असलेल्या एका सोसायटीमध्ये राहत असलेल्या मोहसीन शेख याने तो राहत असलेल्या फ्लॅटमध्ये बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी दोन बकरे आणले होते. ही घटना सोसायटी मधील लोकांना कळताच सर्वांनी जमाव करून बकरे सोसायटी मधून बाहेर नेण्याची मागणी केली. या घडलेल्या घटनेला विरोध करत जमाव केलेल्या नागरिकांनी जय श्रीराम चे नारे दिले, त्याचबरोबर त्यांनी हनुमान चालीसा देखील वाचली. पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर पोलीस दल घटनास्थळी पोहोचले.
सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं की, सोसायटीमध्ये बकरा कापणं अलाऊड नसून आम्ही सुद्धा आमचे सर्व सण सोसायटीच्या प्रीमायसेसच्या बाहेर करतो . यावर पोलीस म्हणाले की, नियमानुसार सोसायटीमध्ये कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे तसं होऊ देखील देणार नाही. आणि जर असं कोणी करत असेल तर त्याच्यावर केस टाकण्यात येईल. पण सोसायटीमध्ये बकरा न आणण्यासाठी कोणताही नियम नसून तुमच्या सर्वांच्या भावना दुखवू नये म्हणून बकरा बाहेर आणण्यात येईल असेही पोलिसांनी म्हंटल. त्यावेळी पोलीस आणि सोसायटी मधील नागरिकांमध्ये थोडा वाद झाला.
दरम्यान, बकरी ईद च्या प्रत्येक वेळेस बिल्डर आम्हाला बकरा ठेवण्यासाठी एक वेगळी जागा देतो. पण या वेळेस ती जागा न मिळाल्यामुळे आम्ही सोसायटीमध्ये ते राहत असलेल्या फ्लॅटमध्येच बकरा ठेवण्याचा निर्णय घेतला. असं या बकऱ्याच्या मालकाने सांगितलं. त्याचबरोबर ते म्हणाले की आम्ही कधीच बकऱ्याची कुर्बानी सोसायटीमध्ये देत नाही. कुर्बानी देण्यासाठी आम्ही कत्तलखाना किंवा मटनच्या दुकानावर जातो.