पुणे । पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची संख्या तुलनेने वाढते आहे. या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड असल्याचे सांगितले जात असतानाच, एक कोरोनाबाधित व्यक्ती स्वतः दुचाकीवर फिरून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हॉस्पिटलमध्ये जागा शोधत असल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. अखेरीस शनिवारी सायंकाळी त्या व्यक्तीला पिंपरी-चिंचवडमधील एका हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली. निगडी परिसरात राहणारी एक व्यक्ती शुक्रवारी करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.
ही व्यक्ती पत्नी आणि लहान मुलासह भाड्याच्या घरात राहते. त्यांची सासूदेखील याच परिसर राहते. ती व्यक्ती, त्यांची पत्नी, मूले आणि सासू या चार जणांना करोनाची लागण झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जागा अपुरी असल्याने त्यांच्या सासूला नऱ्हे, धायरी परिसरातील आणि पत्नी व मुलाला उरुळी कांचन येथील कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या व्यक्तीला घरीच क्वारंटाईन राहायला सांगितले होते. मात्र, आपल्याला त्रास होत असून, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, अशी मागणी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली होती. पण त्यांना हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले नाही म्हणून या व्यक्तीने काही वेळानंतर स्वतःच्या दुचाकीवरून पिंपरी-चिंचवड शहरातील हॉस्पिटल गाठले. बऱ्याच ठिकाणी फिरूनही त्यांना जागा मिळाली नाही.
कामानिमित्त पुण्यात येणे असल्यामुळे त्यांनी पुण्यातील काही मित्रांकडे चौकशी करून त्यांनी पुण्यातील खासगी आणि सरकारी कोव्हिड रुग्णालयात चौकशी केली. मात्र, तेथेही त्यांच्या पदरी निराशा आली. सर्व प्रयत्न करून हताश झालेली ती व्यक्ती घरी परतली. तेव्हा, स्थानिक लोकप्रतिनिधीच्या ओळखीतून पिंपरीतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करून घेण्यात आले. शहरातील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध बेडची संख्या दर्शविणारे डॅश बोर्ड विकसित करण्यात आले आहे. मात्र, रुग्णांना अशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये फेऱ्या माराव्या लागत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.