Tuesday, January 7, 2025

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार का नाही हे पुढील 10 दिवसात कळेल ; कोरोना टास्क फोर्सचा गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईसह संपूर्ण राज्यात बुधवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली. राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे 8 हजार 807 नवे रुग्ण आढळून आले. यात मुंबईतील 1 हजार 167 रुग्णांचा समावेश आहे. राज्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या 80 मृत्यूंपैकी 27 मृत्यू हे मागील 48 तासांमध्ये झालेत. कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर राहुल पंडित यांनी राज्यामधील कोरनाबाधितांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त केलीय. मागील दोन आठवड्यांमध्ये गंभीर प्रकरणं आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे पंडित यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोताना म्हटलं आहे.राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार का नाही हे पुढच्या 10 दिवसांमध्ये स्पष्ट होईल असं ते म्हणाले आहेत.

क्रिटीकल केसेस आणि मृत्यूचं प्रमाण मागील ७ ते १४ दिवसांमध्ये रुग्णवाढ झाल्यानंतर वाढलं आहे,” असं सांगतानाच पंडित यांनी पुढील १० दिवसांमध्ये मुंबईमधील करोना परिस्थिती भविष्यात कशी असेल यासंदर्भातील अंदाज बांधता येईल असं म्हटलं आहे. पुढील दहा दिवस मुंबई शहरासाठी करो या मरो अशापद्धतीचे असतील असे संकेत देताना पंडित यांनी बुधवारी जवळजवळ दोन महिन्यानंतर आमच्या रुग्णालयामधील आयसीयू बेडसंदर्भातील विचारणा वाढल्याची माहिती दिली.

या रुग्णवाढीमध्ये नवीन करोना विषाणूंचा स्ट्रेनचा सहभाग नसेल असं म्हणता येणार नाही अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाय़झरचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’