मुंबई । कोरोनाच्या संशयित रुग्णांकडून कोरोनाची चाचणी करण्यासाठी मनमानीपणे शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती कोरोना चाचणीचा दर ठरवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यातील लॅब पूर्णक्षमतेने वापरण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी राज्य शासनाने राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी हे सदस्य आहेत. तर आरोग्य सेवा संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयसीएमआरने आरटी-पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या ४४ शासकीय आणि ३६ खासगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणीची मान्यता दिली आहे. शासकीय प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या निशुल्क केल्या जात आहेत. खासगी प्रयोगशाळांसाठी आयसीएमआरने ४५०० रुपये इतकी दर निश्चिती केली होती. याकाळात तपासणी चाचण्यांसाठी आवश्यक असणारे किटस् परदेशातून आयात करावे लागत होते. मात्र आता असे किटस् देशातच तयार होत आहेत आणि उपलब्ध देखील आहेत. त्यामुळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी वाटाघाटी करून कोरोना तपासणी दर निश्चित करण्याबाबत आयसीएमआरने कळवले आहे.
ही समिती सर्व जिल्ह्यातील आयसीएमआर मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळांशी कोरोना चाचण्यांच्या दर निश्चीती बाबत वाटाघाटी करून सात दिवसात दर निश्चित करतील. जिल्हानिहाय निश्चित केलेले दर ही समिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल त्याआधारे जिल्हाधिकारी दर निश्चितीसाठी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित जिल्ह्यांसाठी दर निश्चिती करतील. जिल्हाधिकारी निविदा प्रक्रिया पूर्ण करून दर निश्चिती होईपर्यंत या समितीने त्या जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या दरानुसार संबंधित प्रयोगशाळेला शुल्क आकारता येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”