औरंगाबाद : कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी लस प्रभावी अस्त्र आहे. महापालिकेने शहरात लसीकरण मोहीम हाती घेतले असून मनपाचे 117 लसीकरण केंद्र व खाजगी 26 केंद्र लसीकरणासाठी सज्ज असून या केंद्रांवर जाऊन 45 वर्षावरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केले आहे. 30 एप्रिल 2021 नंतर लस न घेणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर फिरू देणार नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. महानगरपालिकेने शहरातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे. 143 केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे कारण जे नागरिक लस घेणार नाही त्यांना 30 एप्रिल नंतर रस्त्यांवर फिरू दिले जाणार नाही. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापर, सुरक्षित आंतर आणि सॅनिटायझर वापर करावा तसेच पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे सांगून महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसापूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. आता तुमच्या शुभेच्छाने मी बरा झालो आहे. मात्र आपणास एक प्रश्न पडला असेल की मला डोस घेऊन ही कोरोना संसर्ग झाला. हे खरे आहे . मात्र लस घेतल्यामुळे कोरोनाचा गंभीर परिणाम होत नाही. रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. 143 ठिकाणी नागरिकांसाठी व व्यापाऱ्यांसाठी, कामगारांसाठी 11 ठिकाणी, बँकांसाठी व शासकीय कार्यालयासाठी 10 केंद्र सुरू करण्यात आले आहेत. बस स्थानक, रेल्वे स्टेशन हायकोर्ट व इतर शासकीय कार्यालयासाठीही लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. महानगरपालिकेने एक महिन्याचे नियोजन केले असून या एका महिन्यात 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून उपायुक्त अपर्णा थेटे व आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली टिम काम करत आहे. महानगरपालिकाकडे आवश्यक लस उपलब्ध आहे . लसीकरणामुळे शहराला फायदा होईल.
महानगरपालिकेने आतापर्यंत लसीकरण मोहीम मध्ये अतिशय चांगले काम केले आहे. शहराची 17 लाख लोकसंख्या असून 1 लाख 70 हजार नागरिकांना लस देण्यात आली हे प्रमाण 10 टक्के एवढे आहे. यानंतर 30 ते 40 टक्के पर्यंत लसीकरण करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. या नियोजनामुळे राज्यात औरंगाबाद शहर सर्वात जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाला आळा बसेल असे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले. शहरात कोरोनाची तणावपूर्ण परिस्थिती असली तरी नियंत्रणात आहे. हळूहळू कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे.
माझ्यासह महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनाही लस घेतल्यानंतर कोरोना झाला होता. लसीमुळे त्यांना गंभीर परिणाम झाले नाहीत ते लवकर बरे झाले आहेत. म्हणून 45 वर्षावरील नागरिकांनी लस घेणे गरजेचे असून 30 एप्रिल 2021 नंतर या वयोगटातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे.