कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाग्रस्त रुग्णांचा सुविधेअभावी बळी गेल्यास स्वस्थ बसणार नाही. तसेच पाटण तालुक्यातील अतिरिक्त बेडपैकी पाटण कोरोना केअर सेंटरसाठी ५० बेड देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त ५० बेड पाटण कोरोना केअर सेंटरला देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्याची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यानच्या काळात तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. यापूर्वी आम्ही कोरोना केअर सेंटरला आवश्यक ते ऑक्सिजन बेड अन्य साहित्य आणि वेळप्रसंगी देणगी व मदत स्वरूपात आवश्यक तो निधी दिला आहे. सध्या तालुक्याची अवहेलना होत असून रुग्णांसह नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोरोनाग्रस्तांचे जीव याचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत व सहकार्य करायला तयार आहोत. त्यामुळे आता तातडीने उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत, आम्ही नेहमीच सर्वच बाजूंनी प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. पण यापुढे प्रशासकीय यंत्रणा अथवा अपुऱ्या सुविधांमुळे कोणाचा बळी गेला, तर त्याबाबत शांतही बसणार नाही असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कोरोनाची पहिली लाट यशस्वीरित्या परतवून लावणारा पाटण तालुका दुसऱ्या लाटेत पूर्णपणे बेजार झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या उपचार सुविधा पाहून पाटण तालुक्यातील कोरोना सेंटरसाठी वाढीव बेड व इतर आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते.
परंतु अद्यापही या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पाटण तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी कराड, सातारा येथे दाखल करावे लागत आहे. सर्वत्र कोरोना वेगाने वाढत असल्याने तिथेही या रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे परिणामी पाटण तालुक्यातील कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. तरीही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. तालुक्यातील रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले.
चार व्हेंटिलेटर, १० ऑक्सिजन कॉन्सनटेटर मिळणार
सातारा जिल्हा बँकेचे संचालक विक्रमसिंह पाटणकर यांच्या मागणीनुसार जिल्हा बैंक संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे पाटण तालुक्याला ४ व्हेंटिलेटर मिळणार आहेत. यासह विक्रमसिंह पाटणकर यांच्या मागणीनुसार १० ऑक्सिजन कॉन्सनटेटर मशीन तालुक्याला देण्यात येणार असल्याचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले.