घरात राहू, कोरोनाशी लढू | ऋषिकेश गावडे
जागतिक आरोग्य संघटनेच्या काल (ता: 24) प्रकाशित झालेल्या कोरोना विषाणुवरील ६४ व्या परिस्थिती अहवालानुसार, जगभरात आतापर्यंत कोरोना विषाणुची लागन झालेले तीन लाख बाहत्तर हजार सातशे पंधरा (३,७२,७१५) रूग्ण आढळले (चाचणी झालेले). त्यापैकी सोळा हजार दोनशे एकतीस (१६,२३१) रूग्णांचा या रोगामुळे मृत्यू झाला. यापैकी १७२२ मृत्यू हे अहवाल प्रकाशित होण्याच्या आधिच्या चोवीस तासात झाले होते. म्हणजेच कोरोना व्हायरस झाल्याची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी साधारण ४.३ टक्के रूग्ण आतापर्यंत दगावले आहेत. भारताचा समावेश असलेल्या दक्षिण – पूर्व आशियायी भागात एकूण १९९९ रूग्ण होते त्यापैकी ६० रूग्ण दगावले आहेत.
मृत्यूदराचा हा आकडा इतर बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. तसेच रुग्णाचा वयोगट, आरोग्याची स्थिती आणि उपलब्ध आरोग्य सुविधा यानुसार मृत्यूचा धोका कमी – जास्त होतो. इंपिरीयल कॉलेज ऑफ लंडन या ब्रिटनमधील विद्यापिठाने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रूग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता सरासरी पेक्षा दहा पटींनी जास्त आहे. तर ह्रदयविकार, मधूमेह आणि श्वसनासंबंधीचे विकार असलेल्या रूग्णांमधे मृत्यूचा धोका सरासरीपेक्षा पाच पटींनी जास्त आहे.
बऱ्याच रूग्णांमधे कोरोना व्हायरस आजाराची फक्त सौम्य ते मध्यम लक्षणे दिसून ते बरे होऊ शकतात असे आढळून आले आहे. चाचणी होण्याच्या आधीच बरे झाल्याने ते एकूण रूग्ण संख्येत मोजले जात नाहीत. ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक वेलान्स यांनी १७ मार्च रोजी मांडलेल्या अंदाजानुसार ब्रिटनमधे कोरोना व्हायरसचे एकूण रूग्ण ५५००० च्या आसपास असावेत. मात्र चाचणी करून कन्फर्म झालेला रूग्णांचा आकडा हा फक्त २००० च्या आसपासच होता. त्यामुळे एकूण जगभराचा असा विचार केल्यास जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला मृत्यूदराचा चार ते पाच टक्के असलेला आकडा प्रत्यक्षात आणखी बराच कमी असू शकतो.
इंपिरीयल कॉलेज च्या पहाणीनुसार ७० ते ७९ या वयोगटातील पाच टक्केच्या आसपास रूग्ण आतापर्यंत दगावले आहेत. तर ६० ते ६९ वयोगटातील मृत्यूचे प्रमाण ३ टक्केच्या आसपास आहे. ३० ते ६० मधील सर्व वयोगटांमधे हे प्रमाण १ टक्केपेक्षा कमी आहे. ३० पेक्षा कमी वयोगटातील आणि बाकीच्या कुठल्याच आरोग्य समस्या नसलेल्या रूग्णांमधे मृत्यूचे प्रमाण जवळपास नगण्य आहे.
पण हा फक्त आतापर्यंतच्या पहाणीवरून काढलेला अंदाज आहे. मंगळवारी (ता: 24) अमेरीकेमधील लॉस एंजल्स येथे एका १८ वर्षांखालील मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त US Today ने दिले आहे. त्यामुळे कोणताच वयोगट कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्युपासून पुर्णपणे सुरक्षित नाही हे लक्षात येते.
कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग भयंकर आहे. तरूणांमधे आणि चांगले आरोग्य असलेल्या व्यक्तींमधे मृत्यूचा धोका कमी असला तरी, ते बाधित झाल्यानंतर आपल्या कुटूंबातील वयस्कर व्यक्तींकडे हा रोग प्रसारित करून त्यांचा जीव धोक्यात घालू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या रोगापासून आपला बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणे, जागतिक आरोग्य संघटना, स्थानिक सरकारे यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ञ सांगतात.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या