शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार
शिराळ्यात तयार होणाऱ्या कोरोनावरील इंजेक्शनला मानवीय चाचणीसाठी नजीकच्या काळात परवानगी मिळणार आहे. ‘ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया’ आणि ‘आयसीएमआर’ची मान्यता मिळून लवकरच येथील आयसेरा बायोलॉजिकल कंपनीत अँटिकोव्हिड सिरम इंजेक्शनच्या उत्पादनास सुरुवात होईल. भारतासह जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनासाठी हा कर्दनकाळ ठरणार आहे. रोज हजारोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. शिराळ्यात अँटिकोव्हिड सिरम उत्पादन अखेर सुरू झाले या आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे, अशी माहिती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
शिराळा औद्योगिक वसाहतीतील आयसेरा बायोलॉजिकल कंपनीस त्यांनी भेट दिली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, माजी जि.प सदस्य अभिजीत पाटील, आयसेराचे संचालक दिलीप कुलकर्णी, नंदकुमार कदम, धैर्यशील यादव, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल प्रमुख उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने म्हणाले, या कंपनीत लस तयार करायला मंजूरी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्रालय, टास्क फोर्स आणि सिरम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. आयसेरा कंपनीने या औषधाच्या मानवी चाचणीस परवानगी मागितली असली तरी या कंपनीची नॉलेज पार्टनर पुण्याची सिरम कंपनी आहे. सिरमच्या सहभागाशिवाय आयसेराच्या मागणीची दखल घेतली जाणार नव्हती. शिवाय अशा औषधांच्या निर्मितीसाठी देशभरात जवळपास शंभरावर कंपन्यांनी मागणी केलेली आहे. आयसेरा मधील उत्पादन, वरिष्ठ पातळीवरील चर्चा आणि आमचे सातत्याने सुरू असणारे प्रयत्न त्यामुळे आयसेरा कंपनीतील उत्पादनास नजीकच्या काळात मानवीय चाचणीसाठी परवानगी मिळेल असे दिसून येत आहे.
शिराळा येथील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्लास्मा थेरपी जर यशस्वी होत असेल तर घोड्याच्या रक्तामध्ये ही प्रतिपिंडे तयार करून ती रुग्णास दिल्यास तो हमखास बरा होईल याचा अभ्यास करून “अँटीकोविड सिरम ” नावाखाली कोरोनाची लस बनवली आहे. मात्र ही लस सरकारने औषधाच्या चाचण्या घेण्यासाठीच्या परवानगी प्रक्रियेत अडकली आहे. जर हे औषध आरोग्य यंत्रणेत उपलब्ध झाल्यास अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचतील. एवढेच नव्हे तर नवीन कोरोनाच्या स्ट्रेनवर ही लस प्रभावी ठरेल याची खात्री यासंस्थेच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. या कंपनीने चीनमध्ये प्रतिजैविकाच्या वापराने मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आल्याचे सिद्ध करत त्याचाच वापर ही लस बनवताना केला आहे.
सरकारने या औषधाच्या चाचण्या घेण्यासाठी प्राथमिकता देणे आवश्यक आहे. त्यास लवकरच परवानगी मिळणार आहे. हे औषध उपलब्ध झाल्यास अनेक कोरोनाग्रस्थांचे प्राण वाचतील याची खात्री आहे. याचबरोबर कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर तसेच गंभीर रुग्णांसाठी हि लस प्रभावी ठरणार आहे.
प्लास्मा ऐवजी अँटीकोविड सिरम उपलब्ध झाल्यास एक संजीवनी
प्लास्मा ऐवजी जर अँटीकोविड सिरम उपलब्ध झाल्यास हे एक संजीवनीसारखे ठरेल. शिवाय हे औषध गुणवत्ता व प्रभावी केल्याने अत्यंत कमी मात्रेमध्ये टोचले तरी याचा गुण येण्यास मदत होईल. आय. सी. एम. आर. व सरकारने परवानगी देऊन हे औषध कसे उपलब्ध करता येईल याबाबत सहकार्य करावे. माजी वरिष्ठ व्हाईस प्रेसिडेंट प्रीमियम सिरम, संचालक आयसेरा दिलीप कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.