केंद्राची गुजरातवर कृपादृष्टी; महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत किती श्रमिक ट्रेन धावल्या याबाबत एक माहिती समोर आली आहे. १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून धावल्या असल्याची बाब समोर आली आहे. गुजरातमधून आतापर्यंत ८५३ श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांक महाराष्ट्र, नंतर पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.

रेल्वे प्रशासनाकडून गुजरातला ८५३ ट्रेन मिळाल्या असून सर्वात जास्त मजुरांची संख्या असलेल्या महाराष्ट्रातून ५५० ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. तर पंजाबमधून ३३३, उत्तर प्रदेशातून २२१ आणि दिल्लीमधून १८१ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांसाठी सर्वाधिक ट्रेन सोडण्यात आल्या आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश (१२४५) पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर अनुक्रमे बिहार (८४६), झारखंड (१२३), मध्य प्रदेश (११२) आणि ओडिशाचा (७३) क्रमांक आहे.

१ मे रोजी पहिली श्रमिक ट्रेन चालवली तेव्हा फक्त ४ ट्रेन चालवण्यात आल्या ज्यामध्ये चार हजार प्रवासी होते. २० मे रोजी सर्वात जास्त २७९ ट्रेन चालवण्यात आल्या. त्यावेळी ४ लाख लोकांनी प्रवास केला. १ मे पासून सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेनमधून प्रवास केलेल्यांमध्ये ८० टक्के प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी दिली आहे. राज्यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे रेल्वे मंत्रालयकडून श्रमिक ट्रेन पुरवल्या जात आहेत. या ट्रेनसाठी येणारा ८५ टक्के खर्च रेल्वे उचलत असून उर्वरित खर्च राज्य सरकारं उचलत आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ट्रेन आपल्या निर्धारित ठिकाणी न पोहोचता भरकटत असल्याचं समोर आलं आहे. त्यासंबंधी रेल्वेने सांगितलं आहे की, “बिहार आणि उत्तर प्रदेशच्या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे धावत आहेत. सोबतच वैद्यकीय तपासणी होत असल्याने टर्मिनलकडून हिरवा कंदील मिळण्यास उशीर होतो. ही सर्व जबाबदारी राज्य प्रशासनाची आहे. राज्य सरकारसोबत चर्चा करत ही समस्या सोडवण्यात आली आहे. सोबतच प्रवासासाठी इतर व्यवहार्य मार्गांचा शोध घेतला जात आहे”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”