सावधान! जून, जुलै महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या २८ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवून ३ मे केला आहे. मात्र आता ३ मे नंतर काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून, जुलै महिन्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंग देव यांनी ही माहिती दिली आहे.

 

पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. त्यानुसार, छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंग देव यांनी सांगितलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून, जुलै महिन्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता सांगितली. त्यामुळे करोना व्हायरसच बराच वेळ आपल्यासोबत असणार आहे. हे पाहता आण त्यादृष्टीने पुढील धोरण आखणं गरजेचं आहे असं ते म्हणाले आहेत”.

नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना सांगितलं की, “करोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते तिथे आज ७ ते ८ आठवड्यांनी भारताच्या तुलनेत १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. आपण योग्य वेळी लॉकडाउनचा निर्णय घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे”.

“लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. करोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. “पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी . मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.” असंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.