करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत आता प्लॅटफॉर्म तिकिट खरेदी करण्यासाठी 50 रुपये खर्च करावे लागणार आहेत. करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने या किंमती वाढविल्या आहेत. पश्चिम रेल्वे विभागात एकूण ७५८ स्थानके आहेत त्यापैकी ४५० स्थानके ही प्रमुख आहेत. त्यातील सुमारे २५० स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक कठोर पावले उचलण्याची तयारी दर्शविली आहे. करोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेता आज दुपारी साडेतीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल, ज्यात बरेच मोठे निर्णय घेतले जातील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्य सरकार लोकल ट्रेन बंद करण्याबाबतचा निर्णय सुद्धा घेऊ शकते.

दरम्यान, आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार मुंबईतील लोकल आणि मेट्रो सेवा बंद करणार आहे का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींकडून विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले,”लोकल आणि मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय माझ्या विभागाच्या अधिकारात येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होणार आहे. परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री याचा निर्णय घेतील. तूर्तास कमी कमीत कमी गर्दी लोकलमध्ये असावी याकडं लक्ष देत आहोत. त्याचबरोबर लोकलची स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

यापूर्वी राज्य सरकारने करोनाचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील सर्व मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता ३१ मार्च रोजी सर्व मॉल्स बंद ठेवण्यात येतील. तथापि, दैनंदिन वस्तूंची विक्री करणारी किराणा स्टोअर खुलीच राहतील. दुसर्‍या परिपत्रकात सरकारने अधिकाऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व क्रीडा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये असे निर्देश दिले आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.