सांगली । राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांवर गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्याला मनाई आहे. तेही केवळ लोकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून. मात्र अशा परिस्थितीतही काही लोक घराबाहेर पडण्याचा अनाठायी हट्ट करत आहे. सांगलीत अशीच एक घटना समोर आली असून नवरा माहेरी सोडण्यास नकार दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीमधील जत तालुक्यात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील नवाळवाडी येथे राहणाऱ्या बेबीजान इब्राहिम नदाफ यांना आपल्या माहेरी जाण्याची इच्छा होती. कर्नाटकातील विजापूर येथे त्यांचे माहेर आहे. पती इब्राहिम नदाफ यांच्याकडे त्या वारंवार माहेरी सोडण्याची मागणी करत होत्या. लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने प्रवास करणं शक्य नसल्याने पती इब्राहिम नदाफ यांनी आपण नंतर जाऊ असं सांगितलं होतं. पण बेबीजान ह्या काही ऐकायला तयार नव्हत्या. माहेरी जाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं.
आपला नवरा माहेरी सोडत नसल्याने बेबीजान नदाफ नाराज झाल्या होत्या. नवरा इब्राहिम नदाफ शेतामध्ये गेल्यानंतर बेबीजान इब्राहिम नदाफ यांनी तडकाफडकी आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.त्यांच्या एका मुलाचं वय ५ तर दुसऱ्याचं ३ वर्ष होतं. बेबीजानच्या आत्महत्येची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”