स्मार्ट बसचा एसटीसोबतचा करार मनपा करणार रद्द

smart city bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहर बससाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने एसटी महामंडळासोबत केलेल्या कराराचा फेर विचार केला जाणार आहे. शहर बसला पुढील वर्षात स्वतंत्र करू, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल सांगितले. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने घेतला होता. त्यानुसार टाटा कंपनीकडून 100 बस खरेदी करण्यात आल्या. बस सेवा चालविण्यासाठी वाहक व चालक एसटी महामंडळाकडून घेण्यासंबंधी सामंजस्य करार 2018 मध्ये करण्यात आला आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. महापालिकेने यापूर्वी खासगी कंत्राटदारामार्फत शहर बससेवा सुरू केली होती; पण ती चार वर्षातच बंद पडली. हा अनुभव लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून कर्मचारी घेण्यासाठी करार करण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी 2019 पासून शहर बससेवा सुरू झाली. दरम्यान, काही महिन्यांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. शहर बससेवा सध्या बंदच आहे. यासंदर्भात प्रशासक पांडेय यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले नव्या वर्षात शहर बस स्वतंत्र केली जाईल. महामंडळ सध्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडचणीत आहे. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. त्यामुळे शहर बससाठी स्वतंत्र कर्मचारी घेण्याचे नियोजन आहे. येत्या वर्षभरात सामंजस्य कराराचा फेर आढावा घेतला जाईल.

30 इलेक्ट्रिक बस घेणार –
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शहर बसच्या ताफ्यात 30 इलेक्ट्रिक बस येतील. यातील पाच बस पर्यटनमार्गावर धावतील, 20 बस मार्चपर्यंत येतील. असे पांडेय यांनी नमूद केले. तसेच पाच इलेक्ट्रिक कार 26 जानेवारीपर्यंत खरेदी केल्या जाणार आहेत.