औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेने मध्यवर्ती जकात नाका येथे पेट्रोल पंप सुरू केले आहे. वाहनधारकांकडून या पेट्रोल-डिझेल पंपाला चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिकेला आर्थिक फायदाही होत आहे. यामुळे आणखी चार ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यात हर्सूल सावंगी नाका आणि कांचनवाडी या ठिकाणी एचपीसीएल च्या माध्यमातून लवकरच पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहेत. अशी माहिती मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे.
महापालिकेने नुकतेच उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याच्या दृष्टीने स्वतःचे पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरात पाच पेट्रोल पंप सुरू करण्याचे नियोजन प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी केले आहे. पहिला पेट्रोल पंप मध्यवर्ती जकात नाका येथे सुरू झाला. आता उर्वरित चार पेट्रोल पंप सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरी पेट्रोलियम कंपन्याच्या अधिकाऱ्यांसोबत पेट्रोल पंपाच्या जागांची पाहणी करण्यात आली.
हर्सूल सावंगी येथे महापालिकेच्या जकात नाका होता आता या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचे निश्चित झाले आहे. एचपीसीएल कंपनी हा पंप उभारणार आहे. तसेच कांचनवाडी भागात मनपा कर्मचाऱ्यांची निवासस्थाने होती. निवासस्थाने पाडण्यात आली आहेत. तेथेही पेट्रोल पंप सुरू केला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही पेट्रोल पंप शहरवासीयांच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास अपरणा थेटे यांनी व्यक्त केला.