गुंटूर : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. यामध्ये मेडिकोंडुरू बायपास रोडवर एका महिलेवर काही जणांनी सामुहिक बलात्कार करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. यानंतर टोळक्यांनी दाम्पत्याला लुटले आणि तेथून फरार झाले. सध्या या दाम्पत्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली आहे. हे दाम्पत्य लग्नाच्या समारंभातून घरी परतत होते. ते बाईकवरून सत्तेनापल्ली या ठिकाणी जात होते. पलाडुगु चौकाजवळ काही लोकांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्यानंतर दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. त्यांच्याकडून पैसे आणि सोनं लुटून घेतलं. त्यानंतर महिलेला खेचत बाजूच्या शेतात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
मध्यरात्री गुन्हा नोंद
या घटनेनंतर हे दाम्पत्य तक्रार नोंदवण्यासाठी सत्तेनापल्ली येथील पोलीस ठाण्यात पोहचले परंतु हा गुन्हा आमच्या हद्दीत घडला नसून तुम्हाला मेडिकोंडरु पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागेल असे सांगून तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून जखमी अवस्थेतील दाम्पत्याला गुंटूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
राज्यभरात संतापाची लाट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळानजीक कोल्ड स्टोरेजमध्ये काम करणाऱ्या काही लोकांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष टीडीपीचे राष्ट्रीय महासचिव नारा लोकेश यांनी या घटनेचा निषेध करत गुन्हे क्षेत्राची हद्द पाहून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास निष्काळजीपणा केला त्यावरून टीका करत दोषी पोलिसांना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे.