हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत , सरकारने महाराष्ट्रातील लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे सरकारने शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात वाढ केली आहे. यामुळेच आता लग्न करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सरकारने घेतलेल्या या एका निर्णयामुळे महाराष्ट्रात लग्न करणाऱ्या जोडप्यांना दिलासा मिळाला आहे.
10 ऐवजी 25 हजार रुपये मिळणार
बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारने शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विवाह करणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये देण्यात येणार आहे. सध्या सामूहिक विवाह किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसूत्र आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी जोडप्याला 10,000 रुपये देण्यात येत होते. तसेच सामूहिक विवाह राबवणाऱ्या संस्थांना 2 हजार रुपये दिले जात होते. मात्र आता या जोडप्यांना 10 ऐवजी 25 हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच, विवाह लावणाऱ्या संस्थांना 2500 रुपये देण्यात येणार आहे. ही रक्कम डीबीटी पद्धतीने संबंधित व्यक्तींच्या खात्यावर थेट जमा केली जाईल.
याचबरोबर, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय, बहुजन कल्याण आणि इतर विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देखील वाढ करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागांनी तसे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर पाठवले जावे असे निर्देश देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, सरकारने बुधवारी झालेल्या बैठकीत इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्येच वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याचा निर्णय तसेच अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.