सांगली | पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथे मगरीने केलेल्या हल्ल्यात महिलेने दाखवलिलेल्या धाडसीपणामुळे वाचली आहे. नम्रता मारुती मोरे (वय ३१) असे जखमी महिलेचे नांव आहे. प्रसांगवधान दाखवून महिला मगरीच्या तावडीतून सहिसलामत बचावली आहे, मात्र मगरीच्या वावर असून केलेल्या हल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णा नदी काठावर असणाऱ्या चोपडेवाडी गावपाणवठ्यावर नम्रता मोरे यांच्यासह अन्य दोन महिला धुणे धुत होत्या. पाण्यातून आलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने त्यांच्या उजव्या दंडाला जबड्यात पकडून पाण्यात खेचायला सुरूवात केली. परंतु यावेळी नम्रता यांनी जोराने आरडाओरडा करीत हात मगरीच्या जबड्यातून सोडवून घेतला.
मगरीच्या तोंडातून हात सुटल्याने नम्रता पाणवठ्यावर पळत आल्या. सावधगिरी व धाडसामुळे मगरीच्या तावडीतून त्यांचा जीव वाचला. मगरीचे दात दंडात घुसल्याने त्यांच्या हाताला दुखापत होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. नागरिकांनी त्यांना तातडीने भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.