कोवीड योध्दांचे 148 दिवसानंतर उपोषण मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या 148 दिवसांपासुन ऊन, थंडी, वारा झेलत कोवीड रुग्णांची शुश्रृषा सुरु ठेवून  कायम करार, पगार दरमहा रु. 25 हजार करा, पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत करा इ. मागण्यांसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले संयमी आंदोलन, साखळी उपोषण जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले.

परंतु न्याय्य मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी कोवीड योध्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असेही आयटकने स्पष्ट केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, औरंगाबाद येथील कथित 74 कंत्राटी कामगारांचे गेल्या 148 दिवसांपासुन साखळी उपोषण सुरु होते. या उपोषणाबाबत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय- औरंगाबाद, सहा.कामगार उपायुक्त कार्यालय, औरंगाबाद, वैद्यकीय शिक्षणमंत्री- महाराष्ट्र शासन,  मुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री, औरंगाबाद यांना अनेकदा निवेदने दिलेली आहेत.

ज्या ज्या कोवीड योध्दयांनी पीपीई किट, एन-95 मास्क, सॅनीटायझर इ. सुरक्षा नसताना मार्च 2020 पासून कोवीड रुग्णांची सेवा केली. त्यामुळे बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली होती व अजूनही काम बंद न करता 6 ते 7 हजार रुपयांच्या तोकड्या पगारात हे उपोषणार्थी 74 कथित कंत्राटी कामगार रुग्णसेवा करीत आहेत. रुग्णसेवा करून सेवा बजावल्यानंतर गेल्या 148 दिवसांपासून साखळी उपोषण करीत होते.

परंतु टाळ्या- थाळ्या वाजवणारे प्रशासन, पुष्पवृष्टी करणारे प्रशासन दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पगार देण्यास असंवेदनशील आहे. वर्तमानपत्रातून बातम्या येत असूनही, घाटी हॉस्पीटलमध्ये पाहणी करण्यासाठी वेळोवेळी येत असूनही प्रशासन, प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी उपोषणार्थींच्या सोबत एकदाही संवाद साधला नाही, विचारपूस केलेली नाही, ही बाब अत्यंत निषेधार्ह व असंवेदनशील आहे, असेही जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आलेले आहे.

Leave a Comment