लॉर्ड्स : वृत्तसंस्था – नॉटिंघममध्ये जी गोष्ट जमली नाही ती रोहित शर्मानं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर केली आहे. रोहितनं लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. रोहितनं फक्त 83 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे इंग्लंडमधील टेस्ट मॅचमध्ये हे पहिलेच अर्धशतक आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये रोहित 107 बॉलमध्ये 36 रन काढून आऊट झाला होता.
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात टीम इंडियाच्या दिग्गज बॅट्समनची कामगिरी खराब झाली आहे. 27 टेस्ट शतक झळकावणारा विराट कोहली लॉर्ड्सवर आजवर फ्लॉप ठरला आहे. विराटचा लॉर्ड्सवरील सर्वोच्च स्कोर फक्त 25 आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माची लॉर्ड्सवर ही पहिलीच टेस्ट मॅच आहे. पहिल्याच टेस्टमध्ये रोहितनं या मैदानात कशी बॅटींग करायची हे दाखवून दिलं आहे.
रोहितनं सलग दुसऱ्या टेस्टमध्ये केएल राहुलसोबत चांगली ओपनिंग पार्टनरशिप करून भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये 97 रनची पार्टनरशिप करणाऱ्या या जोडीनं लॉर्डसमध्ये शतकी पार्टनरशिप केली आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये ओपनिंग जोडीनं 1952 नंतर पहिल्यांदाच 50 पेक्षा जास्त रनची पार्टनरशिप केली आहे.