मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सर्वात जास्त वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई क्रिकेट टीमला नव्या मुख्य प्रशिक्षकाची गरज आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुख्य प्रशिक्षकासह अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुंबईचे विद्यमान प्रशिक्षक रमेश पोवार यांची राष्ट्रीय महिला टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याने ही जागा रिकामी झाली आहे.
‘या’ अटींची पूर्तता आवश्यक
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 24 मे असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनने जाहीर केले आहे. याबरोबर त्यांनी या पदासाठी लागणारे निकष देखील जाहीर केले आहेत. ते निकष पुढीलप्रमाणे :
१) अर्ज करणाऱ्या व्यक्तीने किमान 50 प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावे.
२) तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने प्रमाणित केलेला कोच असावा.
३) त्याच्याकडे कोणत्याही राज्य किंवा आयपीएल फ्रँचाझिच्या कोचिंगचा अनुभव असावा.
४) तसेच त्याचे मुंबईमध्ये निवासस्थान असावे.
या क्रिकेट सत्राच्या सुरुवातीला अमित पागनिस यांची मुंबईचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मुश्ताक अली T20 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यानंतर रमेश पोवारच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने विजय हजारे ट्रॉफीचे विजतेपद पटकावले होते. मात्र आता रमेश पोवार यांची राष्ट्रीय महिला टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई क्रिकेट टीमला नव्या मुख्य प्रशिक्षकाची आवश्यकता आहे.