कराड | नवरात्री उत्सवानिमित्त दसऱ्या दिवशी शहरात दुर्गा दौड काढणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड शहराध्यक्ष सागर जयसिंग आमले, केदार अरुण डोईफोडे, रणजीत बाजीराव पाटील, श्रीकृष्ण व्यंकटेश पाटील, पोतराज पार्टी सचिन खिलारे, विश्वविजयी राजेश देसाई यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकाऱ्यांनी जमाबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू केले आहेत. असे असताना शुक्रवारी दसरा सणाच्या अनुषंगाने सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दत्त चौक कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात काही लोक जमा झाले होते. ही बाब बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली. त्यामुळे पोलिसांनी सागर आमले यांना कशासाठी जमला आहात असे विचारले. त्यावेळी आमले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यासाठी जमलो आहोत, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अशा प्रकारचा जमा जमवण्यास बंदी असल्याचे सांगितले. तसेच आपण जमा होऊ नका. विनापरवानगी कोणताही सार्वजनिक उपक्रम करू नका, असेही पोलिसांनी त्यांना सांगितले. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपणाकडे कोणत्या विभागाची परवानगी आहे का? असे पोलिसांनी विचारल्यानंतर त्यांनी आमच्याकडे कोणताही परवाना नाही, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांचे काही एक न ऐकता सागर आणले, केदार डोईफोडे, रणजीत पाटील, श्रीकृष्ण पाटील, पोतराज पार्टी सचिन खिल्लारे, विश्वविजयी देसाई व इतर लोकांनी नियोजन करून अनेक लोकांना सोबत घेऊन चालण्यास सुरुवात केली.
जमावाने दत्त चौक ते शाहू चौक, दैत्य निवारणी मंदिर ते पुन्हा दत्त चौक. तेथून आझाद चौक, सात शहीद चौक, नामदेव मंदिर, सोमवार पेठ, उत्तरा लक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, कराड नगरपालिका, तेली गल्ली गणपती मंदिरापासून मेन रोड मार्गे पुन्हा दत्त चौक अशी पदयात्रा काढली. यादरम्यान जमावाने छत्रपती शिवाजी महाराज की, जय हर हर महादेव अशा घोषणा देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले, असेही फिर्यादीत म्हटले आहे.