फलटण | फलटण महिला पोलिसाने दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला काठीने वळ उठेपर्यंत मारून रस्त्याने वरात काढल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सविता आगम, असे गुन्हा दाखल झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी दि. 16 डिसेंबर रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस आगम यांनी फलटण शहरातील दत्तनगर येथील एका घरात जाऊन दोन अल्पवयीन मुले व त्यांच्या आईला काठीचे वळ उठेपर्यंत मारहाण केली. त्यानंतर लहान मुलांनी आणलेल्या फुलांच्या झाडाच्या कुंड्या डोक्यावर घेऊन आई व मुलांची महिला पोलिस आगम यांनी आपल्या घरापर्यंत शिवीगाळ करत वरात काढली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याबाबत नागरिकांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात धाव घेत उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे तक्रार केली. तसेच कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, सिकंदर डांगे, संजय पवार, ताजुद्दीन बागवान यांंनी दिला होता. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून उपविभागीय पोलिस अधिकारी बरडे यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी चर्चा करुन महिला पोलिस सविता आगम यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या असून महिला पोलिस आगम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोनि भारत किंद्रे करत आहेत.