औरंगाबाद – ऑनलाइन जुगार अड्ड्यावर सायबर गुन्हे शाखेने छापा मारून तब्बल 49 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई सिडको एन-5 येथे नाट्यगृहाच्या बाजूला सोमवारी केली.
सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, आठवडाभर पाळत ठेवून पथकाने छापा मारला. यात बाबासाहेब विठ्ठल खडके, दामोदर नारायण खडके, बंडू कचरू जौक, कृष्णा सुभाष डोंगरे, संतोष एकनाथ बनकर, प्रभाकर धोंडीबा भोसले, राजू गणपत पवार, ज्ञानेश्वर भाऊसाहेब साळुंके, विशाल सुभाष गोल्डे (रा.औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी ऑनलाइन लॉटरी खेळण्यासाठी बेकायदेशीररीत्या ऑनलाइन लॉटरी सेंटर चालू केले. फॅन्टसी 11 सॉप्टवेअर ॲप्लिकेशन व इनफिनिटीइमॅक्स कॉम या वेबसाइटचा वापर करून जुगार खेळविला. बाबासाहेब विठ्ठल खडके हा कृष्णा एजन्सी अशा नावाने बोर्ड लावून तो लॉटरी सेंटर चालवित होता. इतरांना तो ऑनलाइन पैसे पोहोचवित असे आणि सोमवारी त्याचा हिशोब करून पैसे जमा करून घेत होता. त्याच वेळी सायबर शाखेच्या पथकाने छापा मारून मुख्य सूत्रधारासह आरोपींना ताब्यात घेतले. जुगार खेळणाऱ्यांच्या मोबाइलवर ऑनलाइन जुगार खेळविले जातात, त्यावेळी ही मंडळी मोबाइलवर ‘बॅलन्स’ मारून त्याचे रोख पैसेही वसूल करीत होते.
ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांनी जुगार खेळणाऱ्यांच्या पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी रजिस्टर व विविध प्रकारचे शिक्केही ठेवल्याचे आढळून आले. कोरे धनादेश, पावती बुक, स्टेशनरी इ. साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून रोख 17 लाख, पाच दुचाकी, दोन चारचाकी असा एकूण 49 लाख 35 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण, कविता तांबे, एकनाथ वारे, पोहेकॉ दुडकू खरे, संजय साबळे, प्रकाश काळे, सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, संदीप पाटील आदींचा पथकात सहभाग होता.