सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
कोरेगाव येथे रविवारी झालेल्या बैलगाडी शर्यतीत एक बैलगाडी अचानक बिथरली प्रेक्षकांमध्ये घुसली होती. या घटनेत दहा ते बारा जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर झाले होते. याप्रकरणी दोन दिवसानंतर बैलगाडी शर्यत आयोजक अक्षय सूर्यकांत घोरपडे याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव ते रहिमतपूर मार्गावर एमआयडीसीच्या समोरील जागेत ‘महाराष्ट्र केसरी 2022’ किताब भव्य बैल गाड्यांच्या शर्यती रविवारी भरवण्यात आल्या होत्या. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दुपारपर्यंत बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी परिसरातील गावांमधील शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शर्यतीला यात्रेचे स्वरूप आले होते.
शर्यतीत बैलगाडी शिरल्याने मोठा गोंधळ झाला होता. बैलगाडी प्रेक्षाकांच्यात गेल्याने अनेकांची धावपळ उडाली. अनेकांनी दुसरीकडे पळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दहा ते बारा जण जखमी झाले. या जखमींना तत्काळ कोरेगाव तसेच सातार्यात उपचारासाठी दाखल करण्यात आला. या ठिकाणी शर्यत भरवत असताना प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी धावपट्टीच्या दोन्ही बाजूस प्रतिबंधात्मक कट्टे अगर इतर सुरक्षेची उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.