हैद्राबाद । अंधश्रद्धेला केवळ अशिक्षित माणसंच बळी पडतात या समजाला छेद देणारी एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशात उघडकीस आली आहे. एका उच्चशिक्षित आणि मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या आई-वडिलांनी स्वतःच्या २ तरुण मुलींची निर्घृण हत्या केली आहे. मुलींच्या हत्येनंतर, सोमवारी सतयुग सुरु होणार असल्यामुळे सूर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, या हैराण करणाऱ्या आरोपी दाम्पत्याच्या दाव्यावर पोलिसही चक्रावले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधील मदनापल्ले गावात शिवालयम मंदिर रोड परिसरात पद्मजा, पुरुषोत्तम नायडू आणि त्यांच्या दोन मुली अलेख्या (२७) आणि साई दिव्या (२२) असं कुटुंब राहत होतं. पद्मजा आणि पुरुषोत्तम नायडू हे उच्चशिक्षित असून दोघेही मुख्याध्यापक म्हणून कार्यरतहोते. तर मोठी मुलगी अलेख्याने भोपाळमधून मास्टर्स डिग्री मिळवली होती. धाकटी कन्या साई दिव्या हिचं बीबीएपर्यंत शिक्षण झालं होत . साई दिव्या मुंबईत एआर रहमान म्युझिक स्कूलची विद्यार्थिनी होती. लॉकडाऊनच्या काळात ती घरी परतली होती.
दरम्यान, रविवारी रात्री नायडू यांच्या घरातून आरडाओरड ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा दाम्पत्याने त्यांची अडवणूक केली. मात्र पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा सगळेच अवाक झाले. एका मुलीचा मृतदेह पूजेच्या खोलीत होता, तर दुसरी मुलगी बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. दोघींचे मृतदेह लाल रंगाच्या कापडाने झाकले होते. डोक्यात डंबेल्सनी प्रहार करुन निर्दयी मातापित्याने लेकींचा बळी घेतल्याचा आरोप आहे.
आरोपी दाम्पत्याच्या चेहऱ्यावर गुन्ह्यानंतर अजिबात तणाव दिसत नव्हता. पोलिसांनी हत्येचं कारण विचारलं असता त्यांनी चक्रावणारा जबाब दिला. कलियुग समाप्त होत असून सोमवारपासून सतयुग सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही मुली सूर्योदयासोबत जिवंत होतील, असा दावा त्यांनी केला. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेतलं आहे. दोघींचे मृतेदह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. नायडू कुटुंब लॉकडाऊनच्या काळात विचित्र वागत होतं, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’