वर्धा : हॅलो महाराष्ट्र – आपल्या कानावर अनेक चोरीच्या घटना घडत असतात. हे चोर कधी घरफोडी करतात,तर कधी एटीएममशीनच फोडून नेतात. कधी ऑनलाईन चोरी करतात तर कधी दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांची चोरी करतात. मात्र वर्ध्यामध्ये एक आगळीवेगळी चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चोरटयांनी थेट रुग्णवाहिकाच चोरली आहे. पोलिसांनी जेव्हा याचा तपास केला तेव्हा तिचा शोध लागला. रुग्णालयाच्या आवारातून उभी असलेली रुग्णवाहिकी नेमकी कुणी चोरुन नेली होती, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
काय आहे नेमके प्रकरण
वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून चक्क रुग्णवाहिका चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास केला असता हि रुग्णवाहिका सिद्धार्थ नगरमध्ये आढळून आली. हि रुग्णवाहिका सिद्धार्थ नगरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या एमएसडब्ल्यू वॉर्डासमोर पार्कींगमध्ये उभी होती.
संबंधित प्रकार उघड कसा झाला?
18 जून रोजी रुग्णवाहिका चालक ड्युटी संपल्यानंतर चावी ड्रायव्हरच्या रुममध्ये ठेवून घरी गेला. यानंतर रुग्णवाहिका चालक दुसऱ्या दिवशी कामावर आला असता त्यास रुग्णवाहिका उभी दिसली नाही. या रुग्णवाहिकेचा नंबर एम.एच. 32 जी 0151 असा आहे. हि रुग्णवाहिका आपल्या जाग्यावर नसल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
तक्रारीनंतर अवघ्या दोन तासात रुग्णवाहिका सापडली
रुग्णवाहिका चालकाने सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर रुग्णवाहिका न दिसल्याने त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हि तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता दोन तासांच्या कालावधीनंतर हि रुग्णवाहिका सिद्धार्थनगर परिसरात आढळून आली. यानंतर पोलिसांनी हि रुग्णवाहिका ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणली.