सांगली प्रतिनिधी प्रथमेश गोंधळे
राज्यात दररोज अनेक ठिकाणी चोऱ्या होत असतात त्यांचा उद्देशदेखील वेगवेगळे असतात. येथे मात्र चहाची उधारी मिळत नसल्याच्या कारणावरून दारूच्या नशेत सांगलीतील राम मंदीर परिसरात असणाऱ्या एका चार्टर्ड अकाऊंटंटचे कार्यालय फोडणार्या चोरट्यास आज अटक करण्यात आली. दिलीप विलास माळी असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ९० हजारांची रोकड, एक लॅपटॉप असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली. याप्रकरणी अरविंद देवमाने यांनी फिर्याद दिली होती.
हाती मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास दिलीप माळी हा देवमाने यांच्या कार्यालयाची काच फोडून आत गेला. आतील केबिनमध्ये असलेले छोटे कपाट तोडून त्यामध्ये ठेवलेली दोन लाख रूपयांची रोकड, वीस हजारांचा एक लॅपटॉप आणि त्याची बॅग त्याने लंपास केली. मंगळवारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही चोरी झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजवरून स्पष्ट झाले होते. त्यानुसार तपास करत दिलीप माळी याला अटक करण्यात आली.
दरम्यान सीएच्या कार्यालयाजवळच माळी याचा चहाचा गाडा होता. तो त्या कार्यालयात चहा देत होता. त्याची अडीच हजार रूपयांची उधारी राहीली होती. वारंवार मागूनही ती मिळत नव्हती. तसेच कर्जही वाढले होते. त्यामुळे त्याने दारूच्या नशेत कार्यालय फोडण्याच्या उद्देशाने तेथे गेलो होतो. पण रोकड आणि लॅपटॉप हाती लागल्याने ते चोरल्याची कबुली माळी याने पोलिसांना दिली आहे.