महाबळेश्वर विकायला काढलेल्या २ भामट्यांना अटक; पुण्यातील उद्योगपतीला घातला २५ लाखांचा गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । स्वतःच्या बोलण्याच्या कौशल्याने लोकांना गंडवणारी, आयुष्यातून उठवणारी माणसं कमी नाहीत बरं का..!! एखाद्याने आपल्यावर पूर्णपणे विश्वास टाकावा आणि तो विश्वास आपण ठरवूनच मातीमोल करावा या हेतूने वागणारे भामटे पाहिले की त्यांना फोडून काढण्याची तीव्र इच्छा होते. साताऱ्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

‘जमीन नावावर करून देतो,’ असे आमिष दाखवून साताऱ्यातील नामांकित वकील व त्याच्या मित्राने पुण्यातील उद्योगपतीला २५ लाखांना लुबाडलं असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत उद्योजक वैभव लक्ष्मण गिरी, वय ५४, रा. वारजे पुणे) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दिवंगत दत्तो पिंगळे यांना इनामात मिळालेली ४८७५ एकर व २५ आर जमीन त्यांच्या वारसाकडून मिळवून देण्याचा बहाणा साताऱ्यातील वकील रविराज गजानन जोशी आणि त्यांचे पुण्यातील सहकारी सुहास लक्ष्मण वाकडे यांनी केला होता. हे क्षेत्र संपूर्ण महाबळेश्वरचं आहे. ‘महाबळेश्वर, लिंगमळा, प्रतापगड, वेण्णा लेक, आॅर्थरसीट पॉर्इंट आदी परिसराचा यात समावेश होत असून वकिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वैभव गिरी हे पुढील व्यवहारासाठी तयार झाले.

त्यानंतर अ‍ॅड. जोशी यांनी वाकडे यांच्या पुण्यातील घरात देण्याघेण्याचा व्यवहार ठरवला. गिरी व माधवी ओतारी यांनी जमीन खरेदी व्यवहारापोटी नोव्हेंबर, डिसेंबर २०१९ या काळात ५ लाख रुपये वकिलांना दिले. याशिवाय झालेल्या व्यवहाराची नोटरी जानेवारी २०२० मध्ये पुण्यात करण्यात आली. त्यावेळी चार लाख रुपये रोख व सहा लाख रुपये बँकेतून वर्ग केले. आतापर्यंत एकूण २५ लाख रुपये संबंधितांना देण्यात आले. मात्र मिळकतीचा ताबा देण्याची मागणी केल्यावर अ‍ॅड. जोशी व वाकडे यांनी टाळाटाळ केली आणि त्यांचं बिंग फुटलं. या सर्व प्रकाराने व्यथित झालेल्या गिरी यांनी पोलिसांत धाव घेऊन या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment