सासकल येथे उपकेंद्रातील वीज पुरवठा बंद केल्याने चाैघांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र सासकल याठिकाणी उपकेंद्रातील नियंत्रण कक्षात घुसून वीज उपकेंद्र बंद पाडत, वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याच्या धमकी दिल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सासकल येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची संतोष लक्ष्मण क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सासकल येथील वीज उपकेंद्रामध्ये सोमवारी (दि. 11) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कनिष्ठ यंत्र चालक संतोष लक्ष्मण क्षीरसागर व त्यांच्यासह कर्मचारी ज्ञानेश्वर सुदामराव डाकोरे हे काम करत होते. त्यांना फलटण 132 केव्ही उपकेंद्रातून सासकल वीज उपकेंद्र नियंत्रण कक्ष मोबाइलवर कृषी वीज वाहिनी फोर्स लोड शेडिंग करण्याबाबत मेसेज आला. क्षीरसागर यांनी वडले व दुधेभावी कृषी वीज वाहिन्यांचे भारनियमन केले.

दरम्यान, सासकल गावातील बाबुराव उर्फ निलेश मानसिंग मुळीक, राजेंद्र मुगुटराव धुमाळ, गणेश ज्ञानदेव मुळीक, अमित विष्णू मुळीक हे तिथे आले. क्षीरसागर व सहकारी कर्मचाऱ्यांना ‘आमची स्कूल कृषी वीज वाहिनी सुरू करा,’ असे म्हणत त्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणला. त्याचबरोबर सासकल वीज उपकेंद्र बंद पाडण्यास भाग पाडले.

यामधील अमित मुळीक याने नियंत्रण पॅनल बंद केल्याने तीन तास वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे तालुक्यातील 17 गावांचा वीजपुरवठा बंद राहिल्याने महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. या कारणावरून चौघांविरूध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत.