औरंगाबाद: कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने हळूहळू बरेच क्षेत्र सुरू करण्यात आले होते. लॉकडाऊन नंतर हॉटेल्स, मॉल उघडले परंतु तरीही पर्यटन स्थळे खुली करण्यात आली नव्हती. ती सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली होती. त्याची दखल घेत पर्यटन स्थळे खुली करण्यात आली होती. त्यामुळे हळूहळू पर्यटक देखील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत होते. त्यामुळे पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसाय पूर्वपदावर येणे सुरू झाले होते. परंतु आता पुन्हा पर्यटन स्थळे बंद करण्यात आल्याने पर्यटन व्यवसायावर संकट ओढवले आहे. अनेकांवर तीन महिन्यानंतर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे.
एकीकडे कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने पर्यटन स्थळे बंद करण्याची वेळ आली होती. त्यामुळे पर्यटन स्थळांच्या समोर असलेले छोटे मोठे व्यवसायीकांवर आर्थिक संकट ओढवले होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. लॉकडाऊन नंतर कसे बसे बीबीका मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला उघडण्यात आला होता. त्यामुळे आता पर्यटन क्षेत्राला आणि पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यवसायाला चालना मिळण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा व्यवसायिकांना होती. तसे झालेही होते.
शहरातीलच नव्हे तर देश आणि विदेशातील पर्यटक देखील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी औरंगाबादेत आले होते. त्यामुळे हॉटेल्स व्यवसायिकांबरोबर आदी व्यवसायिकांना त्याचा फायदा होत होता. परंतु १० डिसेंबर २०२० ला सुरू झालेले पर्यटन स्थळे आज पुन्हा १० मार्च ला बंद करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. खासगी वाहनांना देखील त्याचा फटका बसला आहे. अनेकजण पर्यटकांसाठीच खासगी वाहने चालवितात त्यांना वेरूळ, अजिंठा पाहण्यासाठी घेऊन जातात त्यातून त्यांना फायदा होतो. त्यांचा देखील व्यवसाय आता ठप्प झाला आहे. ते देखील खासगी वाहने उभे करून ठेवण्याची वेळ आली असल्याची खंत औरंगाबाद ट्युरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जशवंत सिंग यांनी व्यक्त केली.
तसेच नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. स्वतः ची काळजी स्वतः घेतली तर अशी परिस्थिती उदभवणार नाही. बरेच लोक आज मोलमजुरी करून काम करतात. त्यांच्यावर देखील आर्थिक संकट यामुळे ओढवते. त्याचा देखील विचार करून काळजी घ्यावी असे देखील अवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा