पिंपोडे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जमावाकडून तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाची जमावाने तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दि.15 रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. तसेच जमावाने रुग्णालयाची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याबाबत रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाघोली (ता. कोरेगाव) येथील रोहित पोपट शिंदे (वय- २६ ) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्या युवकाला वाघोली येथील काही युवक व नातेवाईक उपचारांसाठी पिंपोडे बुद्रुक येथील खासगी दवाखान्यात घेऊन गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

तेव्हा त्याठिकाणी नातेवाईकांच्या जमावाने गोंधळ घातला. नंतर पुन्हा मृत युवकास घेऊन जमाव ग्रामीण रुग्णालयात गेला. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनीही त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यावेळी संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयातील केबिनच्या काचा फोडल्या, सॅनिटायझर मशीन फोडले, महिला प्रसूती गृहाच्या खोलीचा दरवाजा फोडला, तसेच दवाखान्यात प्रचंड गोंधळ घातला. रुग्ण सेवेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर व महिला कर्मचाऱ्यांवर ही जमावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पोलिस संरक्षणांची मागणी

सातारा तालुक्यातील कुमठे येथे दोन दिवसापूर्वीच रात्रीच्या वेळेस एकाने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथेही जमावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आरोग्य केद्रांना पोलिसांनी संरक्षण देणे गरजेचे आहे. तसेच गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातून केली जात आहे.

Leave a Comment