पटियाला : वृत्तसंस्था – पटियाला या ठिकाणी एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. या प्रकरणात कौटुंबीक वाद झाल्यानंतर पत्नी रुसून माहेरी गेल्यानंतर पतीने पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न त्याच्याच अंगलट आला आहे. या व्यक्तिची पत्नी अनेक महिन्यांपासून माहेरी राहत होती. याचा पतीला राग आला होता. याच रागातून पतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्नीचे आक्षेपार्ह फोटो आणि मॅसेज तिच्या माहेरच्या परिसरातील संबंधित लोकांना पाठवत व्हायरल केले आहे. यानंतर पत्नीने पोलिसांत पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
या महिलेचा विवाह मेहराज गावच्या धरमिंदर सिंग याच्याबरोबर झाला होता. धरमिंदर यांचा हा दुसरा विवाह होता. सासरचे लोक महिलेबरोबर चांगले वर्तन करत नसल्यामुळे पती- पत्नींमध्ये अनेकवेळा वाद होत होते. त्यामुळे या वादाला कंटाळुन पीडित महिला तिच्या माहेरी निघून गेली होती. बऱ्याच दिवसांपासून हि महिला माहेरी राहत होती. पण तिच्या पतीला हे आवडत नव्हते. त्यामुळे याचा राग मनात धरून त्याने आपल्या पत्नीला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचले.
धरमिंदरने पत्नीच्या नावाने खोटं फेसबूक अकाऊंट तयार केले. त्यानंतर त्याने महिलेच्या माहेरी तिच्या आसपास राहणाऱ्यांना तिच्या नावाने फ्रेड रिक्वेस्ट पाठवली. यानंतर पती त्या अकाऊंटवरून सर्वांना आक्षेपार्ह फोटो आणि मॅसेज पाठवत होता. तसेच त्या अकाऊंटवरून पती अश्लिल चॅटदेखील करत होता. यानंतर त्याने पत्नीला आणखी त्रास देण्यासाठी त्याने अश्लिल चॅट आणि फोटोचे स्क्रीनशॉट पत्नीला पाठवले. पतीच्या या कृत्यानंतर पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपीच्या विरोधात आयटी अॅक्ट 2000 च्या कलम 68 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर त्याच्यावरचे दोष सिद्ध झाले तर त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.