नाशिक प्रतिनिधी | शिवसेनेतर्फे भावी मुख्यमंत्री म्हणून युवासेना नेता आदित्य ठाकरेंकडे पहिल्या जात आहे . शिवसेनेतर्फे आयोजित जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी मालेगाव येथे पोहोचली . यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट मालेगाव बाह्य़ या आपल्या विधानसभा मतदार संघातून उमेदवारी घेण्याचा आग्रह केला आहे . इतकेच नाही तर आदित्य यांनी जर संमती दर्शविल्यास सर्वपक्षीय नेते त्यांना बिनविरोध विधानसभेत पाठवतील, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला. त्यामुळे आदित्य यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून सेनेचे आणि मालेगावचे नाते किती घट्ट आहे याची आठवणही भुसे यांनी यावेळी करुन दिली. सभेप्रसंगी आदित्य यांना मालेगावकरांच्या वतीने रिकामा कलश भेट देण्यात आला. आम्ही आपल्याकडे भावी नेतृत्व म्हणून बघत असून या भागाचा सिंचन, पाणीप्रश्न, शेतकरी कर्जमाफी आदी प्रश्न मार्गी लावून हा कलश भरुन द्यावा, अशी विनंती भुसे यांनी आदित्य यांना केली.
दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे . त्यापार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगलेला आहे. दोन्ही पक्षातर्फे आमचाच मुख्यमंत्री करण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात येत आहे. जनसामान्यांचा आवाज ऐकून लोकांच्या आशीर्वादाने भगवा महाराष्ट्र निर्माण होईल, असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.