डेंजर : साताऱ्यातील मोदी पेढे व्यावसायिकाला बाॅम्बने उडविण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातार्‍यातील मिठाई व्यवसायिकाला गेल्या 8 दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल येत असून 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिस मुख्यालयात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

साताऱ्यातील पेढे व्यवसायिक प्रशांत मोदी असे तक्रार अर्ज केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. गेल्या आठ दिवसापासून त्यांना इंटरनॅशनल कॉल येत आहेत. व्यावसायिकास 30 लाख रुपये दे, अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन, अशी धमकी देण्यात आली. सुरुवातीला मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांना रात्री-अपरात्री देखील फोन येण्याचे तसेच मेसेज करुन वारंवार 30 लाख रुपये देण्यासाठी धमकावले गेले. सुमारे 10 ते 12 कॉल, मेसेज आल्याने मोदी यांनी पोलिस मुख्यालयात याबाबत ई मेल करुन तक्रार अर्ज पाठवला आहे. या तक्रार अर्जात आलेले फोन नंबर, मेसेज याचे स्क्रीन शॉट देखील जोडण्यात आले आहेत. तक्रार अर्जात म्हटले आहे की, येणार्‍या या धमकीमुळे त्यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. दोन मोबाईल नंबर वरुन एकाच प्रकारची धमकी दिली जात असल्याचे तक्रार अर्जात पेढे व्यावसायिक प्रशांत मोदी यांनी म्हटले आहे.

सातारा पोलिसांना मेल पाठवल्यानंतर मंगळवारी प्रशांत मोदी यांनी सायबर पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सातारा पोलिसांनी सर्व माहिती घेवून तपासाला सुरुवात केली आहे. साताऱ्यातील व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सातारा सायबर सेल पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी केली आहे.