औरंगाबाद – औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून धुळे कडे निघालेल्या एका बसचा चेसिसचा सेंट्रल बोल्ट तुटल्यामुळे बसची चाके एकीकडे आणि उर्वरित बसची बॉडी दुसरीकडे सरकली. याच अवस्थेत धोकायदायकरित्या वेगाने बस पळवत २९ प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बसच्या चालकाला सध्या सेवेतून निलंबित केले असल्याची माहिती औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार प्रमुख शिंदे यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरून धुळ्याला निघालेली धुळे आगाराची बस (एमएच १४ डीटी २११९) मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास निघाली. या बसमध्ये २९ प्रवासी होते. बस धावत असताना बसचे तोंड रस्त्याच्या मध्यभागी दिसत होते, तर पाठीमागील डाव्या बाजूस दिसत होते. ही बस शरणापूर फाट्याजवळ एका दुचाकीस्वाराला उडविणार असे दिसतबी असताना तो बालंबाल बचावला. मात्र काही अंतरावर बसने धुळेकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला उडविले. यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत देखील झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
हा सर्व प्रकार एसटी महामंडळाच्या निर्दशनास येताच संबंधित बस तात्काळ औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात परत आणण्यात आली आणि त्या बसमधील २९ प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या बसच्या चालकाने प्रसंगावधान न दाखिविल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर त्या चालकाला सध्या कामावरून निलंबित केले असून, प्रकरणाची पूर्ण चौकशी करून चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे अगरप्रमुखानी सांगितले. सध्या मात्र त्या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.