सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटामध्ये दरड कोसळली आहे. या कोसळलेल्या दरडीमुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. तर दुसरीकडे मांढरदेवी घाटात सुद्धा दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी सावधानता बाळगून प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाका बसला आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले असताना आता दरडी कोसळण्याच्याही घटना समोर येवू लागल्या आहेत. हिवाळ्यात महाबळेश्वर, पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. अशावेळी वाई येथून पाचगणी, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पसरणी घाटात दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला दरड कोसळली आहे. यामुळे काहीकाळ या घाटातील वाहतूक बंद होती.
वाई शहरातून पुढे मांढरदेवी घाटातून काळूबाई देवीला जाणाऱ्या मार्गावरही दरड कोसळली आहे. या मार्गावर बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दरड हटविण्याचे काम हाती घेतले असून एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर पसरणी घाटातही काही काळानंतर वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे. घाटात अवकाळी पाऊस, धुके व ढगाळ वातावरण यामुळे वाहतूकही संथ गतीने सुरू होती.