सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्याचे नगरविकास मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार आणि 10 अपक्ष आमदार फोडल्यामुळे त्यांचे सध्याचे राजकीय वजनही वाढले आहे. दरम्यान त्यांच्या समर्थकांकडून पाठींब्याचे फलकही लावले आजच्या आहे. आता त्यांचे जावली तालुक्यातील मूळ गाव असलेल्या दरे येथील ग्रामस्थांकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झालेले पहायचं आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील ग्रामस्थांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून त्यांना पाठिंबाही दिला आहे. जावली येथील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्र हिताचा असून या निर्णयामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात आणि वाई-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात दरे गाव येते. हा सर्व परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानण्यात येतो. सध्या तिथे राष्ट्रवादीचाच आमदार आहे. एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांना कधीही शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी लुभवण्याचे प्रयत्न केले नाहीत. स्थानिक पातळीवरील राजकारणातही त्यांनी कधी ढवळाढवळ केले नाही. आता शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत आम्ही असणार असल्याची भावना गावकऱ्यांनी स्पष्ट केली आहे. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे, हा गावासाठी गौरव असेल, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे.