सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील
सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक निवडणुकीने जिल्ह्यातील वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोसायटी मतदार संघातून अॅंड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व भाजपचे अतुल भोसले यांचे विश्वासू जगदीश जगताप यांच्या फार्म हाऊसवर राष्ट्रवादीचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवडणुकी संदर्भात भेट घेतली. त्यामुळे आता पालकमंत्री सोसायटी गटातून अॅड. उदयसिंह पाटील यांना टशन देणार की दोघापैकी कोण माघार घेणार हे पाहणे आैत्सुक्याचे बनले आहे.
सोसायटी गटातून 1967 साली विलासराव पाटील- उंडाळकर यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला. सलग 11 वेळा याच मतदारसंघातून काका बँकेत संचालक राहिले. बँकेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष व मार्गदर्शक अशा भूमिका बजावल्या. काका बँकेचे संचालक असतानाच 4 जानेवारी 2020 रोजी त्याचे निधन झाले. काकांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांची निवडणूक लढवावी असा आग्रह नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी धरला. मात्र विद्यमान सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही याच गटातून संचालक म्हणून तयारी केलेली आहे. त्यामुळे आता माघार कोणी घ्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कराड तालुक्यातून सोसायटी गटातून संचालक होणे हे दोन्ही नेत्यासाठी राजकीय प्रतिष्ठेचे बनलेले आहे. कारण या अगोदर बाळासाहेब पाटील यांनी चार पाऊले मागे सरकण्याची भूमिका घेतल्याचे अनेकदा पहायला मिळाले आहे. परंतु सध्या ते जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकारमंत्री आहेत. तेव्हा अशा परिस्थितीत ते यावेळी माघार घेणार नाहीत असे जाणकारांचे मत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने आपल्यावर असल्याने आणि भाजपाला शिरकाव होवू द्यायचा नसल्यास कोणती भूमिका घेणार हे येणारा काळच सांगले.
कराड तालुक्यातून काल अॅड. उदयसिंह पाटील यांनी अर्ज पहिल्याच दिवशी भरल्याने मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जगदीश दिनकर जगताप यांची त्यांच्या वडगाव हवेली येथील फार्महाऊस वर सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांचे चिरंजीव शिवराज जगताप व जगताप कुटुंबीय उपस्थित होते. या वृत्ताचा फोटो खुद्द बाळासाहेब पाटील यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांनी नक्की निवडणूकीत टशन देण्यासाठी जुळवाजुळव सुरू केलेली आहे. तेव्हा आता सोसायटी गटातून अॅड. उदयसिंह पाटील व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यात टशन होणार की कोण माघार घेणार हे काही दिवसातच कळणार आहे. परंतु तोपर्यंत जिल्ह्यातील व खासकरून कराड तालुक्यातील राजकीय पीच तापलेले असणार आहे.