सातारा : राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार व शरद पवार, अजित पवार यांचे विश्वासू असणारे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच जिल्हा बँकेसाठी खिंडीत पकडले आहे. भाजपचे आ. शिवेंद्रराजे यांचे विश्वासू सहकारी ज्ञानदेव रांजणे हे आहेत. येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊन असे सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कराड येथे केले होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक काही तासांवर आली असून अजूनही जावळी सोसायटी मतदारसंघात नाट्यमय घडामोडींचा सिलसिला आज दिवसभर सुरू आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार आज आंबेघर येथे विधानपरिषद चे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्यासह आज सोसायटी मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध आव्हान निर्माण केलेल्या ज्ञानदेव रांजणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन रांजणे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र रांजणे यांच्यासोबत २८मतदार असून या निवडणुकीत रांजणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केला आहे. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाटेत अडथळे निर्माण झाले आहेत.
जावळी सोसायटी मतदार संघात आमदार शिंदे व रांजणे यांच्यात हाय होलटेज लढत होत असल्याने या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून रांजणे यांनी २८ मतदारांना सुरक्षित स्थळी सहलीसाठी नेले होते. त्या मतदारांचे जावळी तालुक्यात आगमन देखील झाले आहे.या निवडणुकीत आमदार शिंदे यांचा मार्ग सुकर व्हावा म्हणून राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर , आमदार शिवेंद्रसिंहराजे , आमदार मकरंद पाटील यांना दूरध्वनीवरून सूचना केल्या होत्या.
त्यानुसार आज रामराजे, शिवेंद्रसिंहराजे व मकरंद पाटील यांनी आज आंबेघर येथे रांजणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन जवळपास एक तासभर कमराबंद चर्चा केली. या वेळी वसंतराव मानकुमरे, बिनविरोध निवडून आलेले संचालक अनिल देसाई हे देखील उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर रामराजे काहीच न बोलता निघून गेले. यानंतर वसंतराव मानकुमरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, की या निवडणुकीत रांजणे यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे. आम्ही देखील राष्ट्रवादी चे कार्यकर्ते असून नेहमीच पवार साहेबांना साथ दिली आहे.
मात्र जावळी तालुक्यातील मतदार व कार्यकर्ते यांनी रांजणे यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली होती. तसेच रांजणे यांनी नियोजनबद्ध पूर्वतयारी केल्यामुळे रांजणे यांचा या निवडणुकीत विजय निश्चित होणार असल्याचा दावा ही त्यांनी शेवटी केला. यावेळी रांजणे यांचे समर्थक ही उपस्थित होते. निवडणुक अवघ्या काही तासांवर आली असून या निवडणुकीत नक्की कोणाचा विजय होणार हे मतमोजणी च्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.