सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील तालीम संघाच्या समोर राहत्या घरात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. सदरील घटनेत घातपाताचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. हात- पाय बांधून खून केल्याची माहिती प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली. संदीप मच्छिंद्र दबडे असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
घटनास्थळावरून व सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील तालीम संघाच्या समोर एका घरात आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला. यावेळी घरात कुणीही नव्हते. तसेच मृतदेहाचे हात- पाय बांधल्याचे प्रथमिक माहितीत समजत आहे.
सध्या मृतदेहाबाबत कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नसून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास करित आहेत. संदीप दबडे यांचा मृत्यू कशामुळे झाला की खून याबाबत पोलिसांनी सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही.