हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथून वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये दि. १ एप्रिल रोजी दहा वर्षीय मुलगा पोहताना वाहून गेला होता. कालव्याला भरपूर पाणी व प्रवाह वेगवान आसल्यामुळे गावकरी व पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर लहानग्याचा मृतदेह तब्बल २० तासानंतर दि.२ एप्रिल रोजी पहाटे सापडला. परंतु मृतदेह दिसताच नातेवाईकांनी जोरात हंबरडा फोडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गजानन समाधान काटकर हा दहा वर्षीय मुलगा धुणे धुण्यासाठी आलेल्या आजी सोबत पोहण्यासाठी कॅनॉलवर आला होता. गजानन हा कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पाठीला प्लास्टिकची कॅन बांधून पोहत असताना पाठीला बांधलेली प्लॅस्टिकची कॅन सुटली आणि मुलगा पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. या बाबत हत्ता पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलिस गजानन काटकरचे नातेवाईक व गावकरी या दहा वर्षीय मुलाचा शोध घेत होते.
या संबंधी कालव्याचे पाणी काही वेळासाठी बंद करण्यासाठी संबंधित विभागाला पोलिसांनी पत्रसुद्धा दिले होते. तसेच आजूबाजूच्या नागरिकांना मुलगा दिसल्यास कळविण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी केले होते. त्याचा शोध घेण्यासाठी कालव्यात ठिकठिकाणी जाळ्या टाकण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता मात्र तो सापडला नाही. कालव्याचे पाणी बंद झाल्यावर शुक्रवारी सकाळी वाहून गेलेल्या गजाननचा मृतदेह जवळच सापडला. त्याचा मृतदेह पाहून नातेवाईकानी हंबरडाच फोडला.