सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी पात्रात लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. आमनापूर, धनगाव, औदुंबर, भिलवडी दरम्यान नदी पात्रात मृत माश्यांचा खच्च पडला आहे. धरणक्षेत्रात आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याच दरम्यान मळीमिश्रीत पाणी अथवा विषारी द्रव्य नदीत सोडल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णेचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. मासेमारी करण्यासाठी अनेक लोक नदीकाठावर बसून असतात. आज सकाळी अचानक मृत माश्यांचा खच नदीकाठावर दिसून आला. जिल्ह्यातील कृष्णा काठी असणाऱ्या आमनापूर, धनगाव, औदुंबर, भिलवडी दरम्यान नदी पात्रात लाखो मृत माश्यांचा खच आढळला.
यावेळी असंख्य मृत मासे पाण्यावर तरंगत होते. विषारी द्रव्य मिसळल्याने किंवा सुरुंग स्फोटाने मासे मरत असावेत असा तर्क वाढवण्यात येत असून या मेलेल्या माश्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण व दुर्गंधी पसरण्याची भीती आहे. नदी पात्रात मृत झालेले मासे खाण्यासाठी धोकादायक असल्याने, ते खाऊ नयेत असे प्रशासनाचने नागरिकांना आवाहन केले आहे. नदी पात्रात यापूर्वीही मळी मिश्रित पाणी सोडल्याने कृष्णा नदीत शेकडो मासे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे मुळे रसायन मिश्रित पाणी सोडणार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.