सातारा | मोबाईल एकाच्या नावावर खरेदी केल्यानंतर त्याचे हप्ते न भरल्याच्या कारणातून चिडून जावून चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करुन हाफ मर्डर केलेल्या घटनेला 1 महिन्यानंतर वेगळे वळण लागले. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. फुटका तलाव येथे घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक बडेकर (वय- 26, रा. मल्हारपेठ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेत मंगेश बडेकर व तक्रारदार अनिकेत विश्वास साळुंखे (वय- 25, रा. शाहूनगर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विराज विनोद साळुंखे (वय 22, रा. रामाचा गोट), जय गायकवाड अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हाफमर्डरची मूळ घटना दि. 2 मार्च 2022 रोजी रात्री फुटका तलाव येथे घडली आहे. यातील मृत युवक व संशयित एकाने मोबाईल खरेदी करताना एकमेकांचे नाव दिले होते. मोबाईल हप्त्यावर घेतल्याने त्याचे हप्ते थकल्याने त्यातून वाद निर्माण झाला. दि. 2 मार्च रोजी हे सगळे एकत्र फुटका तलाव येथे जमल्यानंतर मोबाईलवर वाद विकोपाला गेला व हाणामारीला सुरुवात झाली. नागरी वस्तीमध्ये राडेबाजीला सुरुवात झाल्यानंतर संशयित एकाने धारदार चाकूसारखे शस्त्र काढून वार केले. यात प्रतीक बडेकर हा गंभीर जखमी झाला. तर तक्रारदारासह अन्य एकजण जखमी झाला. हल्ल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रतीक याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी दुसर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात हाफमर्डरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला पकडण्यात आले. पोलिसांनी एकीकडे कारवाई केली असताना दुर्देवाने जखमी प्रतीक बडेकर याचा मृत्यू झाला.