सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे ,
इस्लामपूर-वाघवाडीफाटा मार्गावर प्रतीक पेट्रोल पंपासमोर भरधाव टँकरने मोटरसायकला धडक दिल्याने कुरळप पोलिस ठाण्याचे हवालदार अजय मारूती सुतार यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सकाळी ११ वाजण्याचा सुमारास झाला. याप्रकरणी टँकरचालक शरद शिवाजी चिखले राहणार चिकुर्डे याच्यावर अपघाताचा गुन्हा नोंद झाला आहे.
अजय सुतार हे कुरळप पोलिस ठाण्याकडे गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहेत. आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ड्युटीसाठी इस्लामपूरहून कुरळपला मोटारसायकल वरून ते निघाले होते. दरम्यान इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतिक पेट्रोल पंपासमोर ते आले असता मागून येणारा दूध टँकरच्या चालकाने भरधाव वेगात ओव्हरटेक करत पुढे येऊन अचानक डाव्या बाजूने पेट्रोलपंपाकडे टॅँकर वळवल्याने टँकरची मोटरसायकलला जोराची धडक बसली. या धडकेत मोटरसायकलस्वार अजय सुतार हे टँकरच्या चाकाखाली गेले. त्यांच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात सुतार यांनी घातलेले हेल्मेट फुटून त्यांच्या डोक्याच्या कवठीचा चेंदामेंदा झाला होता. अपघातातील टँकर हा चिकुर्डे येथील आहे.
अपघातानंतर टँकरचालक शरद चिखले याने घटनास्थळावरून गाडी सोडून पलायन केले आहे. या घटनेची माहिती इस्लामपूर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. याबाबतची फिर्याद कुरळप पोलिस ठाण्याचे हवालदार बाजीराव भोसले यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. अजय सुतार हे कुरळप पोलिस ठाण्यात 3 वर्षांपासून कार्यरत असून कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.