सिंधुदुर्ग प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आधी शिवसेना, मग काँग्रेस, पुन्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अशी वाटचाल करणाऱ्या नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला अद्यापही हिरवा कंदील मिळताना दिसत नाही. विद्यमान राज्यसभा खासदार असलेल्या नारायण राणे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक त्यांना भाजप पक्षाचं तिकीट मिळवून देईल असा चंग बांधला जात असतानाच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंना पक्षात घेणं युतीच्या दृष्टीने घातक असल्याचं सांगत या वादात उडी घेतली आहे. शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे स्वतः आपल्या अनेक भाषणांमध्ये नारायण राणे यांना आक्षेपार्ह भाषेत बोलतात. याचाच वचपा काढण्यासाठी नारायण राणे यांचे नितेश व निलेश हे दोन्ही चिरंजीव जशास तसे या न्यायाने कुणाचीही भीड न बाळगता शिवसेना नेत्यांवर टीका करतात. ही टीका जिव्हारी लागल्याचं दीपक केसरकर यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.
नारायण राणेंची मुलं ही अत्यंत तीव्र शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. शिवसैनिकांना आधीच बाळासाहेबांविरोधी बोललेलं चालत नाही. अशा परिस्थितीत नारायण राणेंना भाजपमध्ये घेतलं तर शिवसैनिक नाराज होतील. आदरणीय मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट माहित असून उद्धव ठाकरेंशी चर्चा करून ते याबाबतीत योग्य तो निर्णय घेतील असंही केसरकर पुढे म्हणले. उर्वरित महाराष्ट्रात सेना-भाजप युतीमध्ये जागा वाटपामध्ये आलबेल वातावरण असताना कोकण पट्ट्यात मात्र सेना-भाजप युतीचं भवितव्य अंधारात दिसत आहे. नारायण राणेंना हाताला धरत कोकण पट्ट्यात वाटचाल करण्याचे भाजपचे मनसुबे शिवसेना उधळून लावणार असल्याचं एकूण चित्र या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.